श्रीगोंदा पोलिसांतील हाणामारी ही केवळ अफवा.! चेष्टा-मस्करीतून गैरसमजाचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्टीकरण..

दिनांक १९ सप्टेंबर २०२६ श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा संदेश गेल्या २४ तासांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांच्या जबाबानुसार प्रत्यक्षात कोणतीही हाणामारी किंवा गंभीर वाद झालेला नसून, चेष्टा-मस्करीदरम्यान आवाज वाढल्याने गैरसमज निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १८) ड्युटी संपवून घरी जाणारे पोलीस कर्मचारी संभाजी गर्जे आणि गेटवर कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी संदीप राऊत यांच्यात नेहमीप्रमाणे चेष्टा-मस्करी सुरू होती. यावेळी दोघांचा बोलण्याचा आवाज काहीसा वाढल्याने परिसरातील काहींना दोघांमध्ये वाद किंवा हाणामारी सुरू असल्याचा भास झाला. त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी कंपनी चालक कक्षात बसून वरिष्ठ अधिकारी सपोनि वाघ यांच्या उपस्थितीत आपापसातील गैरसमज दूर केला.

दरम्यान, या प्रकाराचा वेगळा अर्थ काढून काही प्रत्यक्षदर्शी अथवा स्थानिकांकडून सोशल मीडियावर हाणामारी झाल्याची चर्चा सुरू झाली. पाहता पाहता हा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

सोशल मीडियावरील चर्चेची गांभीर्याने दखल घेत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि वाघ यांनी संबंधित पोलीस कर्मचारी संदीप राऊत व संभाजी गर्जे यांना बोलावून त्यांचे अधिकृत जबाब नोंदविले.
दोन्ही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या लिखित जबाबात आपल्यात कोणत्याही प्रकारची हाणामारी अथवा भांडण झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ड्युटी संपल्यानंतर चेष्टा-मस्करीत बोलत असताना मोठ्या आवाजात बोलल्यामुळे गैरसमज निर्माण झाला. वरिष्ठांच्या उपस्थितीत चर्चा करून हा गैरसमज दूर करण्यात आला असून, एकमेकांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोणत्याही घटनेची सत्यता पडताळून न पाहता सोशल मीडियावर संदेश प्रसारित अथवा फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अपुऱ्या माहितीतून अफवा पसरल्यास त्यातून नागरिकांमध्ये अनावश्यक संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हाणामारीच्या चर्चेला संबंधित कर्मचाऱ्यांच्या जबाबातून वेगळे स्वरूप प्राप्त झाले असले, तरी वरिष्ठ पोलिसांकडून या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकाराबाबत कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी, या संपूर्ण प्रकाराची चौकशी चालू आहे. सदर घटना ही खाजगी कारणातून झाली आहे की, अन्य काही कारणातून, याची सविस्तर माहिती व तपास घेण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले आहे.

स्रोत :(अधिकृत माहितीनुसार )

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading