दिनांक ३ सप्टेंबर २०२६, अहिल्यानगर/मुंबई:
कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या डिंबे-माणिकडोह १६ किमी बोगद्याचे काम तळपातळीपासूनच तातडीने सुरू करावे, अशी आक्रमक मागणी श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी (पिंपळगाव पिसा) येथील शेतकरी नेते मारुती साहेबराव भापकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांना सविस्तर निवेदन पाठवले आहे.
कुकडी पाटबंधारे प्रकल्पांच्या कामासाठी चतुर्थ सुप्रमा अंतर्गत ५ हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी दिल्याबद्दल निवेदनात शासनाचे आभार मानण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
मूळ प्रकल्प अहवालानुसार अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्याचा ६२ टक्के हिस्सा असताना, राजकीय दबावामुळे प्रत्यक्षात केवळ ३८ टक्के पाणी मिळून उर्वरित पाण्याचा वापर पुणे जिल्ह्यात होत असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे. डिंबे कालवा वारंवार फुटत असल्याने पुणे जिल्ह्यात दुहेरी स्रोताचा वापर होतो, तर श्रीगोंदा, कर्जत, करमाळा व पारनेर तालुक्यातील शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहतात.
डिंबे-माणिकडोह बोगद्याच्या शेतकरी हिताच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्याचा निषेध करण्यात आला आहे. दहा वर्षे पालकमंत्री असताना त्यांनी अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्याला मागे ढकलण्याचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कोणत्याही दादागिरीला किंवा हुकूमशाहीला बळी न पडता शासनाने हा बोगदा तळपातळीपासून तातडीने सुरू करावा. अन्यथा श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड व करमाळा तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा मारुती भापकर यांनी दिला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
