दिनांक ४ सप्टेंबर २०२६, श्रीगोंदा/मुंबई:
तालुक्यातील आरोग्य वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या गैरवापर प्रकरणात, शहरातील मातोश्री रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत. जुलै २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीत भाजप तालुकाध्यक्ष डॉ. विक्रम भोसले-कसरे यांच्या मातोश्री हॉस्पिटलने तब्बल ६५ रुग्णांच्या उपचारापोटी ५२ लाख रुपयांचा आर्थिक लाभ लाटल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी विशेष समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेना तालुका प्रमुख इंजि. निलेश उत्तमराव गोरे यांनी थेट सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.श्री. प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.

मातोश्री हॉस्पिटलमध्ये एकाच विशिष्ट कुटुंबातील तब्बल पाच सदस्यांचे (पती-पत्नी, आई-वडील, भाऊ व भावजय) हिप रिप्लेसमेंट करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे.तर, दुसऱ्या एका प्रकरणात एकाच घरातील तीन सदस्यांची ऑपरेशन्स अवघ्या ८ ते ११ दिवसांच्या अंतराने पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे.
यापुढे तिसऱ्या उदाहरणात एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी या दोघांचेही काही दिवसांच्या अंतराने बोगस हिप आणि गुडघा रिप्लेसमेंट झाल्याची चर्चा आहे.., रुग्णांचे बनावट एम.आर.आय. अहवाल, डिस्चार्ज कार्ड व वैद्यकीय पुराव्यांचा आधार घेऊन हा महाघोटाळा रचण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे.

आमदार विक्रम पाचपुतेंनी राजीनामा घ्यावा – निलेश गोरे ..
या संपूर्ण प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा, यासाठी श्रीगोंदा तालुक्याचे भाजप नेते व आमदार श्री. विक्रम पाचपुते यांनी तात्काळ पाऊल उचलत भाजप तालुका अध्यक्ष डॉ. विक्रम भोसले-कसरे यांचा राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी ‘निर्भीड कलम न्यूज’च्या माध्यमातून युवासेना तालुका प्रमुख इंजि. निलेश गोरे यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणामागे नेमके कोणत्या आमदार महोदयांचे शिफारस पत्र वापरण्यात आले असून, कोणाचे राजकीय पाठबळ आहे.? याचाही सखोल तपास करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
स्रोत:(निवेदन)
