गौरी शुगरकडून गेल्या हंगामातील उसाला ३१०० रुपये भाव; यंदा आठव्या दिवशीच खात्यावर पैसे जमा होणार.. अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांची हिरडगाव येथे ग्वाही; चौथ्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपण सोहळा संपन्न.

दिनांक २५ ऑक्टोबर २०२६,श्रीगोंदा:

गौरी शुगर कारखान्याने गेल्या गाळप हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये प्रमाणे पेमेंट दिले आहे. याशिवाय दिवाळीपूर्वी २०० रुपये अतिरिक्त दर आणि दिवाळीनिमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर देण्यात येणार आहे. तसेच, यंदाच्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाचे पैसे आठव्या दिवशीच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातील, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली.

हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील गौरी शुगर कारखान्याच्या चौथ्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपण व गाळप हंगाम शुभारंभ सोहळा कारखान्याच्या संचालिका रेखा बोत्रेपाटील व ओमराजे बोत्रेपाटील यांच्या हस्ते उत्साहात पडला. या प्रसंगी बाबुराव बोत्रेपाटील बोलत होते.

आपल्या भाषणात पुढे बोलताना बोत्रेपाटील म्हणाले की, “३५ साखर कारखाने चालवणारा उद्योग समूह म्हणून ओंकार शुगर ग्रुप पुढे आला असून, हा जगातील साखर उद्योगातील सर्वात मोठा ग्रुप आहे. आम्ही शेतकऱ्यांकडून शेअर्सपोटी एक रुपयाही घेतलेला नाही, तसेच शासनाची कोणतीही सवलत घेतलेली नाही; त्यामुळे सहकार क्षेत्रातील लोकांनी आमच्यावर टीका करू नये.”

यंदाच्या परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे एकूण गाळप कमी होणार आहे. तरीही, अहिल्यानगर जिल्ह्यातील गौरी शुगर कारखाना सर्वाधिक (उच्चांकी) भाव देईल आणि ऊस उत्पादक शेतकरी तसेच वाहतूकदारांचे पैसे आठव्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा करेल.

https://link.amazon/B0etuACOj

समारंभाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण फराटे यांनी केले. यावेळी टिळक भोस व नवनाथ शितोळे यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास कारखान्याच्या संचालिका रेखा बोत्रेपाटील, ओमराजे बोत्रेपाटील, उद्योग समूहाच्या सीईओ तेजस्विनी बर्गे, सचिन चौधरी, संतोष दरेकर, कुंडलिक बनकर, भूषण बडवे आणि सरव्यवस्थापक वसंत जरमळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नवनाथ दरेकर यांनी मानले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply