दिनांक २६ ऑक्टोबर २०२६,श्रीगोंदा:
पेपरफुटी, ऑनलाइन परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पोलीस भरतीतील अनियमितता आणि एमपीएससीतील रिक्त पदांमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ कार्यक्रमात प्रशासनाला जाब विचारला.
सखी सन्मान फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख वक्ते विवेकानंद पाटील, आमदार हेमंत ओगले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार शिरसागर, तहसीलदार सचिन डोंगरे आणि पोलीस निरीक्षक सुभाष सानप उपस्थित होते.

पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे, वयोमर्यादेत वाढ करावी, परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात, तसेच मुलींसाठी निवास आणि विद्यार्थ्यांसाठी एसटी प्रवासाची सुविधा द्यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. काही विद्यार्थ्यांना स्मशानभूमीत बसून अभ्यास करावा लागत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.
आमदार हेमंत ओगले यांनी पोलीस भरतीसाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे, तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले. महिनाभरात ग्राउंड ट्रॅक तयार करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

विवेकानंद पाटील यांनी पेपरफुटी, शिक्षणाचे बाजारीकरण आणि राजकीय व्यवस्थेवर टीका करत अन्यायाविरोधातील लढ्यात विद्यार्थ्यांनी एकजूट ठेवण्याचे आवाहन केले.
सुजितकुमार शिरसागर यांनी संघर्ष सुरू ठेवण्याचा सल्ला दिला, तर तहसीलदार सचिन डोंगरे यांनी अभ्यासात सातत्य, शिस्त आणि योग्य नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आता ठोस कार्यवाही कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
