दिनांक २१ ऑक्टोबर २०२६, श्रीगोंदा/अहिल्यानगर:
श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे येथील जालिंदर बर्डे यांच्या पत्नीचे चार महिन्यांपूर्वी अपहरण झाले असून, जाताना घरातील १५ हजार रुपयेही चोरून नेण्यात आले आहेत. याप्रकरणी पती पुरावे घेऊन पोलीस ठाण्यात गेला असता, श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा न नोंदवता केवळ ‘बेपत्ता’ असल्याची नोंद केली.

तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल अभय काळे हे आरोपींना पाठीशी घालत असून, केस मिटवण्यासाठी तक्रारदारावर प्रचंड दबाव टाकत आहेत. काळे यांनी या प्रकरणी आर्थिक तडजोड केल्याचा संशय पीडित पतीने व्यक्त केला आहे. तसेच आरोपींकडून साक्षीदारांना जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे.
आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून पत्नीची सुटका न केल्यास, येत्या ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पीडित पतीने दिला आहे.

आरोपी मैफत गायकवाड आणि गोरख बर्डे हे उघडपणे फिरत असून तक्रारदार जालिंदर बर्डे यांच्यासह या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हौसराव गोरे आणि कानिफ बर्डे यांना जिवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत.
तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल अभय काळे हे पीडिताला मदत करण्याऐवजी उलट आरोपींचीच ढाल बनल्याचे दिसत आहे. “तू केस मिटवून घे,” असा प्रचंड मानसिक दबाव काळे तक्रारदारावर टाकत आहेत.
स्रोत:(निवेदन)
