श्रीगोंदा बस आगारात सुल्तानी कारभार.! आजारी महिलेची अवहेलना करणाऱ्या कंडक्टर गिलकेवर कारवाई कधी.? भंगार गाड्या आणि घाणीकडे DM भापकरांची ‘डोळेझाक’; २२ ऑक्टोबरला उपोषणाचा इशारा.!

कर्मचाऱ्यांचा जातीभेद व मानसिक छळ तात्काळ थांबवा; विविध मागण्यांसाठी नागरिक व प्रवासी आक्रमक

दिनांक २० ऑक्टोबर २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा बस आगाराचा कारभार दिवसेंदिवस रामभरोसे चालला असून, प्रवाशांची होणारी हेळसांड, आगारातील अस्वच्छता आणि प्रशासकीय मुजोरी विरोधात आता संताप अनावर झाला आहे.

श्रीगोंदा–त्र्यंबकेश्वर बसमध्ये प्रवासादरम्यान एका आजारी महिला प्रवाशाची सर्वांसमक्ष अपप्रतिष्ठा करणाऱ्या वाहक (कंडक्टर) गिलके यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह आगारात वाढलेल्या भंगार बसेस, स्थानकातील घाणीचे साम्राज्य आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला छळ या गंभीर मुद्यांवर गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा बस आगाराबाहेर बेमुदत उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

यासंदर्भात जिल्हा विभाग नियंत्रक अहिल्यानगर यांच्याकडे अधिकृत तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.

दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा–त्र्यंबकेश्वर बस प्रवासादरम्यान एक महिला प्रवासी आजारपणामुळे अस्वस्थ झाल्याने बसच्या पायऱ्यांवर बसली होती. मात्र, बसचे वाहक गिलके यांनी या आजारी महिलेला सहकार्य किंवा स्वतःची जागा देण्याऐवजी, स्वतः ऐटीत बसून त्या महिलेची सर्वांसमक्ष मानहानी होईल असे बेजबाबदार कृत्य केले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महिला वर्गात आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.आजारी महिलेची सर्वांसमक्ष अपप्रतिष्ठा करणाऱ्या वाहक गिलके यांच्यावर अद्यापही योग्य कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई का झाली नाही? तात्काळ दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

https://link.amazon/B00jizGIW

श्रीगोंदा आगारात प्रवाशांच्या सुरक्षेचा तातडीने प्रश्न ऐरणीवर आला असून, आगारात खराब, जीर्ण व भंगार झालेल्या बसेसची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक बसेस कधीही रस्त्यात बंद पडतात किंवा तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. या भंगार बसेस तातडीने आगारातून बाद करून नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात.

श्रीगोंदा बस स्थानक परिसरात आणि प्रवाशांच्या प्लॅटफॉर्मवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी.

बस आगारातील काही अरेरावी करणारे अधिकारी आणि DM (आगार व्यवस्थापक) यांच्याकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात असून त्यांच्यावर अन्याय व कामात छळ केला जात आहे. हा जातीभेद व कर्मचाऱ्यांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवण्यात यावी.

जर २२ ऑक्टोबर २०२६ पूर्वी या सर्व मागण्यांची दखल घेऊन दोषींवर कारवाई झाली नाही, तर गुरुवारी सकाळी श्रीगोंदा बस आगाराच्या बाहेर कायदेशीर मार्गाने तीव्र उपोषण व आंदोलन केले जाईल. या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा एसटी वाहतूक विस्कळीत झाल्यास त्याची संपूर्ण प्रशासकीय व नैतिक जबाबदारी आगार व्यवस्थापक (DM) प्रणव भापकर व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

या अर्जाच्या प्रती परिवहन आयुक्त, कामगार आयुक्त, व्यवस्थापकीय संचालक (मुंबई) तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्याला माहिती व पुढील कायदेशीर कारवाईसाठी सादर करण्यात आल्या आहेत.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply