श्रीगोंदा बस स्थानकावर आंदोलनाचा धसका.! दोषी कंडक्टर गिलकेवर ७ दिवसांत कारवाईचे DM भापकरांचे लेखी आश्वासन; शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती..

अनागोंदी कारभाराविरोधात बसपा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह सामाजिक संघटना आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा..!

दिनांक २३ ऑक्टोबर २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा–त्र्यंबकेश्वर बसमध्ये प्रवासादरम्यान आजारी महिलेची मानहानी करणाऱ्या वाहक (कंडक्टर) गिलके यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, यासह आगारातील भंगार बसेस, घाणीचे साम्राज्य आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा छळ थांबवावा या मागण्यांसाठी गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा बस स्थानकाबाहेर प्रचंड आंदोलन पार पडले. या आंदोलनाची गंभीर दखल घेत श्रीगोंदा आगार व्यवस्थापक (DM) प्रणव भापकर यांनी चौकशीसाठी ७ दिवसांची मुदत मागून दोषी कंडक्टर गिलके यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

श्रीगोंदा आगारातील अनागोंदी कारभाराविरोधात पत्रकार चंदन घोडके यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे (BSP) सुनील ओहोळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकराइट) चे निलेश गायकवाड यांनी आंदोलकांची भूमिका अत्यंत प्रखरपणे मांडली.

“एसटी बसमध्ये आजारी महिलेची मानहानी करणे आणि प्रवाशांना सोयीसुविधा न देता आगारात घाण व भंगार बसेसचा खच साचणे ही प्रशासकीय निष्काळजीपणाची पराकाष्ठा आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा होणारा छळ खपवून घेतला जाणार नाही,” असा थेट इशारा सुनील ओहोळ आणि निलेश गायकवाड यांनी आपल्या भाषणात दिला.

असंतोषाचा उद्रेक पाहता श्रीगोंदा आगार व्यवस्थापक (DM) प्रणव भापकर यांनी आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट दिली आणि आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. या प्रकरणी संपूर्ण चौकशी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी मागण्यात आला असून, दोषी वाहक (कंडक्टर) गिलके याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अधिकृत लेखी आश्वासन DM भापकर यांनी आंदोलकांना दिले.

https://link.amazon/B04dQnNr5

या आंदोलनाला सुनील ओहोळ (बसपा), निलेश गायकवाड (RPI आंबेडकराइट), सचिन घोडके, बापु भोईटे, प्रशांत शिंदे, अंबादास घोडके, भीमराव घोडके (वंचित बहुजन आघाडी), अमोल डाळिंबे, सागर आल्हाट, दीपक घोडके, दिलीप कर्डिले, नितीन जावळे यांच्यासह वरिष्ठ पत्रकार सत्यवान शिंदे, योगेश चंदन, श्रीरंग साळवे, जावेद इनामदार, आप्पा चव्हाण आणि मोठ्या संख्येने नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाने दिलेल्या ७ दिवसांच्या मुदतीत जर दोषी कंडक्टरवर कडक कारवाई झाली नाही आणि इतर मागण्या मार्गी लागल्या नाहीत, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने शेवटी देण्यात आला.

स्रोत:(आयोजित आंदोलन)

Leave a Reply