दिनांक ६ ऑक्टोबर २०२६, श्रीगोंदा/नाशिक:
प्लॅट स्वतःच्या भावाच्या नावावर करून देण्याचा दबाव, चारित्र्याचा संशय आणि सततच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून एका ३५ वर्षीय परिचारिकेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरे, दीर, दिराणी, नणंद आणि नंदोई अशा सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित पतीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत परिचारिका नाशिकमधील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होती. २०१४ मध्ये तिचा विवाह झाला होता. तिने स्वतःच्या नावावर अहिल्यानगर येथे एक फ्लॅट घेतला होता. हा फ्लॅट पती दिराच्या नावावर करून देण्यासाठी पती सतत दबाव टाकत होता.

तसेच तिच्या पगाराचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतल्यानंतर आणि मुलाच्या खर्चासाठी कार्ड मागितले असता पतीने तिच्या चारित्र्याबद्दल संशय घेऊन प्रचंड त्रास देणे सुरू केले. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना फोन करणे, वारंवार मारहाण करणे आणि मानसिक खच्चीकरण केल्यामुळे तिने न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराविरोधात अर्जही दाखल केला होता.
गेल्या रविवारी सकाळी संशयिताने पुन्हा चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण केल्यामुळे त्रासाला कंटाळून तिने विषारी पावडर प्राशन केली. प्रकृती बिघडल्यानंतर तिने स्वतः गाडी चालवून खासगी रुग्णालय गाठले. तेथे डॉक्टरांनी पतीला बोलावून अनामत रक्कम भरण्यास सांगितली असता, त्याने पैसे भरण्यास नकार दिला आणि तिला जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून तो निघून गेला. माहेरच्या लोकांनी तिला तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान सोमवारी तिचा मृत्यू झाला.

या गुन्ह्यात नोंदविण्यात आलेले सर्व संशयित आरोपी मूळचे श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्यातील घारगाव येथील राहणारे आहेत. यामध्ये एका शासकीय कार्यालयात लिपिक असलेला मृत महिलेचा पती, सासू, सासरे, दीर, दिराणी, नणंद आणि नंदोई यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
