दिनांक १ ऑक्टोबर २०२६, श्रीगोंदा:
तालुक्यातील वेळू येथील शिवारात एकाच झाडाला तरुण-तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विकास आखाडे आणि गीता मसाने अशी मृतकांची नावे असून, दोघेही मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास आखाडे व गीता मसाने हे दोघे दोन दिवसांपूर्वीच वेळू येथील शेतकऱ्याच्या शेतात शेतमजुरीसाठी आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था शेतातील परिसरामध्येच करण्यात आली होती.

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे इतर मजूर शेतात कामासाठी गेले असता, त्यांना शेतातील एकाच झाडाला तरुण आणि तरुणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून मजुरांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ याची माहिती शेतमालक आणि श्रीगोंदा पोलिसांना दिली.
माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृत गीता हिचा विवाह झालेला होता, तर विकास हा अविवाहित होता. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे सविस्तर जबाब नोंदवून घेतले.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही हे दोघे जण घरातून निघून गेले होते. दोघेही लग्नाच्या उद्देशाने घर सोडून पळून आले होते, असा प्राथमिक अंदाज नातेवाईक व पोलिसांकडून वर्तवला जात आहे. मात्र, त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले? याचा नेमका उलगडा अद्याप झालेला नाही. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमोल मरकड व संभाजी शिंदे करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
