श्रीगोंदा कनेक्शन उघड: मनोहर मामा भोसले, रामदास झोळ यांच्यासह २४ जणांवर सोलापूर ग्रामीण पोलिसांची ‘मकोका’अंतर्गत मोठी कारवाई..

दिनांक १४ ऑक्टोबर २०२६,सोलापूर / श्रीगोंदा:

अघोरी पूजा, जादूटोणा आणि विविध आमिषे दाखवून भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनोहर मामा भोसले, रामदास झोळ यांच्यासह श्रीगोंदा तालुक्यातील वेळू येथील नरेंद्र सांगळे व इतर सहकारी अशा एकूण २४ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका – MCOCA) कठोर कारवाई करण्यात आली आहे.

करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे महाराजांच्या मठात येणाऱ्या भाविकांना अघोरी पूजा आणि जादूटोण्याचे आमिष दाखवून त्यांची मोठी आर्थिक लूट केली जात होती. मठातील अघोरी पूजा आणि जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथील नरेंद्र सांगळे हा पाहत होता. भक्तांकडून देणगीच्या स्वरूपात रोखीने आणि ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या रकमेची विल्हेवाट लावण्यात नरेंद्र सांगळे याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला यापूर्वीच अटक केली आहे.

Ad

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, भाविकांकडून लुटलेला हा काळा पैसा कायदेशीर करण्यासाठी स्वामी चिंचोळी (ता. दौंड, जि. पुणे) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचा वापर केला जात होता. संस्थेचे चालक रामदास झोळ व माया झोळ हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही रक्कम संस्थेत आणून कायदेशीर मार्गाने फिरवून ती पुन्हा परत पोहोचवत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

कुडूंवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ३१८(२), ३१८(४), १११(२)(ब), १११(३), १११(४), १११(६), १११(७) आणि ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा निर्मूलन आणि काळा जादू अधिनियम २०१३: कलम ३(२) व ३(३) या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आणि त्याचे साथीदार सध्या अटकेत आहेत.

https://link.amazon/B0aZzeQpQ

या संघटित गुन्हेगारीला समूळ नष्ट करण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे ‘मकोका’ कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून सर्व २४ आरोपींवर आता ‘मकोका’ अंतर्गत कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Leave a Reply