दिनांक १६ नोव्हेंबर २०२६,अहिल्यागर /श्रीगोंदा:
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

काल, रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा आणि नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी चार अवैध ‘बिंगो’ जुगार अड्ड्यांवर छापे टाकून १ लाख २८ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यामध्ये एकट्या श्रीगोंदा शहरातील तीन अड्ड्यांचा समावेश असल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदा व नेवासा परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.

सिद्धार्थनगर, श्रीगोंदा येथील योगेश अनिल घोडके (वय ३२) याच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात सर्वाधिक ४५,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवधूतनगर, श्रीगोंदा येथील शुभम अरविंद दीक्षित (वय २८) याच्याकडून ३७,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तर कुंभारगल्ली, श्रीगोंदा येथील ऋषीकेश निंबराज हेंद्रे (वय २७) याच्या अड्ड्यावरून २७,५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेला.
तसेच तरवडी (ता. नेवासा) येथील विवेक पोपट पुंड (वय २६) याच्याकडून १८,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या चारही आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सपोनि हरिष भोये आणि पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अरुण गांगुर्डे, अशोक लिपणे, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, अतुल लोटके, बिरप्पा करमल, रोहित मिसाळ व प्रताप देवकाते यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
