श्रीगोंद्याचे क्रीडा संकुल १० वर्ष पासून धूळखात; ४०० मीटर ट्रॅक आणि अभ्यासिका सुरू करण्यासाठी युवकांचा एल्गार.!

दिनांक १६ नोव्हेंबर २०२६,श्रीगोंदा:

तालुक्यातील युवकांना क्रीडा सुविधा आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बंद अवस्थेत असलेले श्रीगोंदा तालुका क्रीडा संकुल तातडीने सुरू करण्याची  मागणी विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत ओगले  यांनी मागणी केली आहे.

लाखो स्वप्ने उराशी बाळगून पोलीस भरती, सैन्य भरती व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

श्रीगोंदा तालुका क्रीडा संकुलाच्या जागेत ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक विकसित करून आवश्यक दिवाबत्तीची व्यवस्था करावी. यासाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करावा.

हे मैदान केवळ खेळाडूंसाठीच नव्हे, तर पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी तसेच शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांना सकाळी व सायंकाळी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठीही याचा लाभ घेता येईल.


अभ्यासिका असूनही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा नाही!

दुसरीकडे, श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील अपूर्ण व बंद अवस्थेत असलेल्या अभ्यासिकेचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. ग्रामीण भागातून शहरात येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य जागा उपलब्ध होत नसताना अभ्यासिकेचे काम अपूर्ण राहणे ही दुर्दैवी बाब आहे. सदर अभ्यासिकेचे बांधकाम तातडीने पूर्ण करून ती विद्यार्थ्यांसाठी खुली करावी.

मैदान आणि अभ्यासिका या युवकांच्या भविष्याच्या दोन महत्त्वाच्या गरजा आहेत. एका बाजूला मैदानाअभावी खेळाडूंची प्रगती खुंटत आहे, तर दुसऱ्या बाजूला अभ्यासाच्या सुविधांअभावी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शासनाने या प्रश्नांकडे केवळ बांधकाम म्हणून न पाहता युवकांच्या भविष्याशी निगडित महत्त्वाचा विषय म्हणून पाहावे आणि तातडीने अपूर्ण बांधकाम पूर्ण करून दोन्ही सुविधा कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

यावेळी शरद चाकणे, खरसडे सर, संतोष भोईटे, एडवोकेट सुमित बोरुडे डॉक्टर गोरख बाईकर महेश दरेकर सचिन डांगी सचिन वागस्कर शंकर कोठारी, सतीश बोरुडे, असलम शेख, धनंजय काळे, प्रशांत सिदनकर,  संदीप दहातोंडे, जितेंद्र पाटोळे, सुरज शेख, समीर शिंदे, ओंकार तांबे, सोनू आढावा, नयन पोकळे, बालाजी गदादे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(उपोषण)

Leave a Reply