पती-पत्नीमधील वाद आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मेहुण्याचा लोखंडी कत्तीने वार करून खून केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारातील चिंतामणी डोंगर परिसरात घडली आहे.
या दुर्दैवी घटनेत किरण रोहिदास भोसले (रा. चिंतामणी डोंगर, पिंपळगाव कौडा, ता. नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर हरीश गुलाब काळे (मूळ रा. शेडगाव, ता. श्रीगोंदा; सध्या रा. चिंतामणी डोंगर, पिंपळगाव कौडा, ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय घडली?
याबाबत मृत तरुणाचा भाऊ विक्रम रोहिदास भोसले (वय ४०, रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण भोसले हा आपले दाजी (हरीश काळे) आणि बहीण यांच्यात चाललेले भांडण सोडवण्यासाठी गेला होता. भांडण सोडवल्याचा राग आरोपी मेहुणा हरीश काळे याला आला.
रागाच्या भरात हरीशने किरणला शिवीगाळ व दमदाटी करत लोखंडी कत्तीने त्याच्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे किरणला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू
घटनेनंतर आरोपी हरीश काळे घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक शिरीष वमने, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश वारुळे, उपनिरीक्षक उमेश पतंगे आणि मंगेश नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, आरोपीच्या शोधासाठी पिंपळगाव कौडा, सुपे आणि त्याच्या मूळ गावी श्रीगोंदा येथे शोध घेण्यात आला, परंतु आरोपी अद्याप मिळालेला नाही. नगर तालुका पोलिस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत.
