दिनांक १ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:
नवरा पसंत नसल्याने त्याच्या भावी पत्नीनेच त्याला ठार मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका मुलीचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील तरुणाशी होणार होता. मात्र, तिला हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे तिने संदीप गावडेच्या मदतीने थेट एक लाख ५० हजार रुपयांची सुपारी देऊन भावी नवरदेवाचा खून करण्याचा कट रचला. यवत पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी मुलगी सध्या फरार आहे.

पोलिस तपासात असे समोर आले आहे की, कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील तरुण हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाट्याजवळ, यवत पोलिस हद्दीत, काही जणांनी त्याला अडवले. लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्याला गंभीर दुखापत केली.

या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ३५२ आणि ३५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे (रा. घुगलवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह हा कट रचल्याची कबुली दिली.

या प्रकरणी यवत पोलिसांनी आदित्य दांगडे, संदीप गावडे, शिवाजी जरे, सुरज जाधव आणि इंद्रभान कोळपे यांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची वेरणा कार पोलिसांनी जप्त केली आहे.

या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, लग्न ठरलेल्या दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. फरार असलेल्या मुलीचा शोध घेतला जात असून लवकरच तिला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..
