काष्टी आठवडे बाजार हलविण्याच्या चर्चेला विरोध – सरपंच साजन पाचपुते यांचे सडेतोड उत्तर..

दिनांक १ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील आठवडे बाजार हा राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजाराला गावातील नागरिकांचे मोठे योगदान लाभले आहे. गेल्या दोन पिढ्यांपासून चालत असलेल्या या बाजाराला काही जण गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजार इतरत्र हलविण्याच्या चर्चेवर जोरदार टीका करत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व लोकनियुक्त सरपंच साजन पाचपुते यांनी अशा लोकांना थेट आव्हान दिले आहे की, “जर तुमच्यात खरी हिंमत असेल, तर काष्टीचा बाजार इतरत्र हलवून दाखवा!”

गेल्या दोन दिवसांपासून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काष्टीचा बाजार हलवण्याची भाषा करत आहेत. त्यावर प्रत्युत्तर देताना पाचपुते म्हणाले, “स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या त्रासामुळे बाजार हलविण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्रास कोणाला झाला याची स्पष्टता दिली जात नाही. आम्ही बाजार समितीमध्ये चाललेली अंदाधुंदी उघड करत असल्याने सत्ताधाऱ्यांना त्रास होत आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.”

काष्टीमध्ये दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. त्यामुळे गावची बाजारपेठ वाढेल आणि शेतकरी, व्यापारी व दुकानदारांना रोजगार मिळेल, असा ग्रामपंचायतीचा हेतू आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी बोगस पावत्या छापून भ्रष्टाचार केला जात आहे. हे थांबवण्यासाठी आम्ही विरोध करत असल्यामुळे काहींना अस्वस्थता निर्माण झाली आहे, असेही पाचपुते म्हणाले.

ग्रामपंचायत बाजारातील स्वच्छता आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाममात्र कर आकारते. यामध्ये ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कोणताही हस्तक्षेप नसतो. मात्र, सत्तेतील पदाधिकारी बाजाराच्या गेटवर बसून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने पैसे गोळा करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. “चुकीच्या कामाला मी नेहमीच विरोध करत असल्यामुळे मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पण मी डगमगणारा नाही. स्व. सदाआण्णा पाचपुते यांचा मुलगा आहे आणि त्यांच्या तत्वांवरच मी काम करतो. त्यामुळे बाजार हलवण्याच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही,” असे पाचपुते यांनी ठणकावले.

भ्रष्टाचार लपवण्यासाठी अपात्रतेचा ठराव का? श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक मिटिंगला मी हजर आहे की नाही, याचा पुरावा सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे आहे. जर मी गैरहजर होतो, तर मला भत्ता का दिला गेला? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांकडे नाही. मी भ्रष्टाचाराविरोधात ठाम उभा असल्यामुळे माझ्या अपात्रतेचा ठराव काढण्यात आला आहे, असा आरोप पाचपुते यांनी केला.

काष्टी आठवडे बाजार लिलाव ३ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीमार्फत काष्टी आठवडे बाजार लिलावाच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, गुरुवार, ३ एप्रिल २०२५ रोजी वार्षिक लिलाव होणार आहे. सर्व व्यापारी बांधव आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी शरद कवडे यांनी केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading