#श्रीगोंदा.. १६ वर्षीय मुलीचा बालविवाह उघड – पतीसह दोन्ही कुटुंबांवर गुन्हा दाखल..

दिनांक ३१ मे २०२५, श्रीगोंदा/शिक्रापूर (ता. शिरुर):

हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे ऑक्टोबर २०२३ मध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आला होता. नुकतेच या तरुणीने ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिल्याने ती अल्पवयीन असल्याचे समोर आले आणि या बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांसह पती, सासू-सासरे व इतर नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हिवरे कुंभार येथील चंद्रभागा लोंढे यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह श्रीगोंदा तालुक्यातील रवि शेलार या युवकाशी केला होता. विवाहानंतर मुलगी श्रीगोंदा येथे सासरी राहत होती. नुकताच तिने ससून रुग्णालयात बाळाला जन्म दिला. तपासादरम्यान ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णालय प्रशासनाने शिक्रापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलीस उपनिरीक्षक विजय चौधरी, पोलिस कर्मचारी विशाल देशमुख, महिला पोलीस हवालदार नीता चव्हाण आणि पूजा सावंत यांनी ससून रुग्णालयात जाऊन पीडित मुलीचा जबाब नोंदवला. चौकशीत मुलगी, तिचे आई-वडील आणि सासरच्या मंडळींना तिच्या वयाची पूर्ण माहिती होती, तरीही त्यांनी बालविवाह केला असल्याचे स्पष्ट झाले.

महिला पोलीस हवालदार नीता चव्हाण (शिक्रापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रभागा लोंढे, सतीश लोंढे, धनश्री लोंढे (सर्व रा. हिवरे कुंभार) आणि रवी शेलार, सुनिता शेलार, छबु शेलार, सोनाली पंचरस (सर्व रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading