दिनांक ३१ मे २०२५,श्रीगोंदा/अंबाजोगाई:

अंबाजोगाई बस स्थानकात २९ मे रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात लातूर /पुणे या श्रीगोंदा आगाराच्या बसखाली सापडून एक युवक ठार झाला. अंकुश मोरे (वय अंदाजे ३५, रा. धानोरा बुद्रुक) असे मृताचे नाव आहे.

लातूरहून आलेली लातूर-पुणे एस.टी. बस (क्रमांक MH-14 MH-1701) अंबाजोगाई बस स्थानकात शिरत असताना ही दुर्घटना घडली. बसच्या मागील बाजूस अंकुश मोरे हे पडले असताना त्यांच्यावर बसचे मागील चाक गेले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ अंबाजोगाई येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती बसच्या चालकाने स्वतः अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात जाऊन दिली. सदर बस ही लातूर येथील मुक्कामी असून श्रीगोंदा आगाराची आहे. अपघात बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
