दिनांक १ जून २०२५, श्रीगोंदा/पुणे:

मुकुंदनगर भागातील एका मंदिरातील दानपेटी फोडून ३८ हजारांची रोकड चोरून पसार झालेल्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ३८ हजार ४०० रुपये रोख रक्कम आणि कटावणी जप्त करण्यात आली आहे.

महादेव गिरमकर (वय ४२, रा. कौठा, विकासवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर येथील एका मंदिराचे दरवाजे तोडून दानपेटीतून रोकड चोरून नेण्यात आली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी घेतले. चित्रीकरणात एक संशयित इसम दिसून आला होता. या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान चोरट्याचा वावर स्वारगेट एस.टी. स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून गिरमकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली.

या कामगिरीत परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, शैलेश आलाटे, शंकर संपते, सागर केकाण, अश्रृबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण आदींनी सहभाग घेतला.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
