निवी (ता. शिरूर) : हावरे-निवी रस्त्यावर निवी गावच्या हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दत्तात्रय नाना रायकर (वय ३५, रा. हेंगावडी, ता. श्रीगोंदा, सध्या रा. यवत, ता. दौंड) यांचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.
दत्तात्रय रायकर हे मंगळवारी रात्री हेंगावडी येथून यवतला जात असताना रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. महावितरणच्या केबलसाठी खोदलेल्या खड्ड्यातील माती व मुरूम रस्त्यावर आल्याने दुचाकी घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
रायकर यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यावरील खोदकामानंतर योग्य सुरक्षा व्यवस्था न केल्यास अशा दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
