लक्षवेध मल्टीस्टेटमध्ये 3 कोटींचा घोटाळा उघड; अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चेअरमन नीलेश फुंदेला अटक

अ हिल्यानगर तालुक्यातील चास व परिसरासह जिह्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या लक्षवेध मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या पतसंस्थेत आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून, सुमारे 2 कोटी 98 लाख 56 हजार 638 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी चास येथील शेतकरी गोरख गिताराम काळे (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेअरमन नीलेश शिवाजी फुंदे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) याच्यासह महेश भास्कर भोर (रा. भोरवाडी, ता. अहिल्यानगर), आकाश दत्तात्रय ढगे (रा. कामठी, ता. श्रीगोंदा), प्रदीप चंद्रकांत जगताप (रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा), पूनम किशोरलाल मुथ्था (रा. केडगाव, अहिल्यानगर), सुभाष तुकाराम आरडे (रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) व विद्या वैजनाथ ढाकणे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चेअरमन नीलेश फुंदेचे कारनामे

चेअरमन नीलेश फुंदे याने लक्षवेध मल्टीस्टेटमध्येच नाही, तर इतर संस्थांमध्येदेखील लोकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ध्येय मल्टीस्टेट फसवणूक प्रकरणातही फुंदे संशयित आरोपी आहे. तो ध्येय मल्टीस्टेटचा संचालक आहे. तसेच सह्याद्री मल्टीस्टेटमध्येदेखील त्याचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच, तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी चेअरमन फुंदे याला बोधेगाव येथून अटक केली आहे.

गोरख काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लक्षवेध संस्थेचा चेअरमन नीलेश फुंदे याने त्यांना 12 टक्के व्याजाचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून काळे यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी 10 लाख रुपये मुदतठेव म्हणून जमा केले. शाखा व्यवस्थापक प्रशांत बाबासाहेब गुंजाळ यांनी त्यांना पावती दिली. मात्र, काही दिवसांपूर्वी संस्थेबाबत अफवा पसरू लागल्याने काळे यांनी पैसे परत मागितले असता, चेअरमन व संचालक मंडळाने मोबाईल बंद करून ठेवले. वारंवार शाखेला भेट दिल्यानंतर ती बंद असल्याचे आढळून आले. यानंतर काळे यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली. चौकशीअंती पोलिसांनी चेअरमन फुंदेसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

12 टक्के व्याजाचे आमिष

गोरख काळे यांच्या तक्रारीनंतर लक्षवेध मल्टीस्टेटबाबत अधिक चौकशी केली असता, सन 2023 पासूनच संस्थेच्या नावाखाली मुदतठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून अनेक ठेवीदारांकडून पैसे गोळा करून फसवणूक केल्याचे उघड झाले. चास, भोयरे पठार, बाबुर्डी बेंद, अकोळनेर, निंबळक आदी गावांतील सुमारे 105 ठेवीदारांचे सुमारे 2 कोटी 98 लाख 56 हजार 638 रुपये अडकले आहेत. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून, फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.




Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading