श्रीगोंदा | १६ मार्च २०२६ श्रीगोंदा:
तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालले असून, पोलिसांच्या आशीर्वादानेच हे प्रकार सुरू असल्याची चर्चा आता जनमानसात रंगू लागली आहे. बेलवंडी बुद्रुक, कोळगाव, पिंपळगाव पिसा, खरातवाडी, राजापूर, माठ आणि उखलगाव यांसारख्या मोठ्या गावांमध्ये मटका, हातभट्टी दारू आणि जुगार अड्ड्यांनी उच्छाद मांडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच बेलवंडी पोलीस ठाण्याचा पदभार नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी स्वीकारला. मात्र, त्यांच्या आगमनानंतर अवैध धंद्यांवर ठोस कारवाई होण्याऐवजी, हे धंदे अधिक जोमाने फोफावल्याचे चित्र आहे.
काही ‘वादग्रस्त’ पोलीस अंमलदार या अवैध धंदेवाल्यांशी सलगी ठेवून असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्यांच्याकडून ‘मलिदा’ गोळा करण्यातच काही कर्मचाऱ्यांना रस असल्याचे बोलले जात आहे.
गावागावात खुलेआम सुरू असलेल्या या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. रात्री उशिरापर्यंत चालणारे मटका आणि जुगार अड्डे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध दारू विक्रीमुळे कौटुंबिक कलह वाढत आहेत. मटक्याच्या नादात अनेक हातावर पोट असणारे मजूर देशोधडीला लागत आहेत.
रात्रीच्या वेळी चालणाऱ्या जुगार अड्ड्यांमुळे परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. “या अवैध धंद्यांना रोखणार कोण.?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
केवळ कागदोपत्री कारवाई न दाखवता, प्रत्यक्ष जमिनीवर हे अड्डे उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. तसेच, जे पोलीस कर्मचारी या अवैध व्यवसायांना पाठीशी घालत आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून बेलवंडी हद्दीतील सर्व अवैध धंदे कायमचे बंद करावेत आणि संबंधित बीट अंमलदारांची सखोल चौकशी करावी. अशी मागणी जोर धरत आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
