जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २४ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अहिल्यानगर, दि. १६ 

समाजाच्या विकास प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा मानला जातो. युवकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने राज्य शासनाच्या युवा धोरण २०१२ अंतर्गत जिल्हास्तर युवा पुरस्कार दिला जातो.

सन २०२५-२६ या वर्षासाठी पात्र युवक-युवती व संस्थांनी दि. २४ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.

या पुरस्कारासाठी १३ ते ३५ वयोगटातील युवक-युवती तसेच नोंदणीकृत संस्था पात्र आहेत. अर्जदाराचे वय १ एप्रिल रोजी किमान १३ वर्षे पूर्ण आणि ३१ मार्च रोजी कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने संबंधित जिल्ह्यात किमान पाच वर्षे वास्तव्य केलेले असावे.

अर्जासोबत केलेल्या सामाजिक कार्याचे पुरावे (वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, छायाचित्रे इ.) जोडणे बंधनकारक आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याबाबत हमीपत्र सादर करणे आवश्यक राहील. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त केलेल्या व्यक्तीस इतर जिल्ह्यात पुन्हा अर्ज करता येणार नाही. शासन अथवा निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचारी या पुरस्कारासाठी अपात्र राहतील.

संस्थांसाठी स्वतंत्र पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त ॲक्ट १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेने किमान पाच वर्षे कार्यरत असणे बंधनकारक असून, कार्याचे पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाकडून प्रमाणित चारित्र्य दाखला सादर करणेही आवश्यक आहे.

पात्र युवक-युवती व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावेत आणि निर्धारित मुदतीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading