आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार बनवण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘जलसंधारण दिन’ साजरा केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आणि विशेषतः युवा पिढीला या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आग्रही आवाहन केले आहे.
जलसंधारणाचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी सकाळी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच युवा पिढीला जोडण्यासाठी विशेष रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
सहभागासाठी क्यूआर कोड उपलब्ध या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत आणि वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी राज्य शासनाच्या अधिकृत जाहिरातींवर तसेच समाजमाध्यमांवर क्यूआर (QR) कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी हा कोड स्कॅन करून आपले नाव नोंदवावे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
“चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राला जगवूया,” असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाला लोकचळवळीचे रूप देण्याची विनंती केली आहे.
