दिनांक १३ ऑगस्ट २०२६,श्रीगोंदा:
तालुक्यातील लिंपणगाव येथील एका तरुणाचा मृत्यू पाय घसरून विहिरीत पडून झाला नसून, तो एक सुनियोजित घातपात (खून) असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आंतरधर्मीय विवाहाच्या वादातून हा प्रकार घडला असून, हे प्रकरण ‘ऑनर किलिंग’चे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी अर्जाद्वारे पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तातडीने सखोल तपास न केल्यास, आगामी ३१ ऑगस्ट २०२६ पासून पोलीस स्टेशनसमोर अनेक सहकाऱ्यांसह घंटानाद करून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा नाना पाचपुते, काष्टी यांनी दिला आहे.

मृत तरुण काही काळापूर्वी नोकरीच्या ठिकाणी असताना त्याने एका तरुणीशी विवाह केला होता. मात्र, कुटुंबातील काही सदस्यांना हा विवाह अजिबात मान्य नव्हता. यावरून घरात सतत वाद आणि कलह सुरू होता.
विरोध करणाऱ्या नातेवाईकांनी तरुणाच्या वडिलांना सोबत घेऊन संबंधित तरुणीच्या घरच्यांशी संपर्क साधत आर्थिक तडजोड करून तिला तिच्या घरी परत पाठवण्यास भाग पाडले होते आणि जबरदस्तीने विवाह मोडण्यात आला होता.

तरुण आणि ती तरुणी अद्यापही संपर्कात असल्याच्या संशयातून आणि तो तिला पुन्हा परत आणेल या भीतीपोटी त्याचा काटा काढण्यात आल्याचा आरोप आहे. मृत तरुणाला पोहता येत असतानाही तो पाय घसरून विहिरीत पडला आणि मृत पावला, हा प्रकार पटण्यासारखा नाही. असे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मृतदेह बाहेर काढताना मृतदेहाच्या कंबरेला दगड बांधलेला होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तसेच, घटना घडल्यानंतर पोलिसांना अंधारात ठेवून मृतदेह बाहेर काढणे, मोबाईल CDR व लोकेशनची कसून चौकशी न करणे यांसारख्या अनेक गोष्टी संशयास्पद असल्यामुळे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पाचपुते यांनी केली आहे.
स्रोत:(पोलीस अधीक्षकांना दिलेले निवेदन)
