श्रीगोंदा तालुक्यात शेतातील कॉपर केबल चोरणारा रंगेहात पकडला; बेलवंडी पोलिसांत गुन्हा दाखल

श्रीगोंदा (प्रतिनिधी):

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील पांढरेवाडी परिसरात शेतातील बोअरवेल, विहीर आणि सौरपंपांची कॉपर केबल चोरी करणाऱ्या एका संशयिताला शेतकऱ्यांनी रंगेहात पकडून बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याकडून विविध शेतकऱ्यांच्या सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या कॉपर केबल जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढरेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकरी अनिल बापूराव मोरे हे ८ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास कोळगाव शिवारातील लिंबाच्या बागेत काम करत होते. त्या वेळी त्यांच्या ओळखीतील एक व्यक्ती बोअरवेलची कॉपर केबल कापून घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मोरे यांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि बेलवंडी पोलिसांच्या हवाली केले.

संशयिताकडे कसून चौकशी केल्यानंतर कोळगाव परिसरातील संजय शितोळे, संदीप बारवकर, गणपत बारवकर, विश्वास लगड, दादासाहेब लगड आणि राजेंद्र भोईटे यांच्या विहीरी, बोअरवेल आणि सौरपंपांच्या कॉपर केबलही चोरीला गेल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली ८० हजार रुपयांची कॉपर केबल जप्त केली असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading