दिनांक १८ ऑगस्ट २०२६, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था पोदार लर्न स्कूल मधील १५ ऑगस्टच्या सांस्कृतिक कार्यक्रम बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमा न लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
या प्रकाराची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकार व सामाजिक पदाधिकाऱ्यांसमोर शाळेचे प्राचार्य शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने संविधान लिहिलेले नसून त्यांच्यासोबत अनेकजण होते, त्यामुळे सर्वांचे फोटो लावावे लागतील,” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला.
घटनेच्या निषेधार्थ तातडीने स्थानिक प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांना निषेध निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, रिपब्लिकन पक्ष (आंबेडकराईट) संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, तालुकाध्यक्ष बापू भोईटे, बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट तसेच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट पोदार लर्न स्कूल गाठले. तेथे त्यांनी संस्थेचे सदस्य, संचालक आणि प्राचार्य शहा यांची भेट घेऊन या प्रकाराबद्दल कडक शब्दांत निषेध नोंदवला.

दरम्यान, या प्रकरणात आधीच गाव बंदची तयारी तीव्रतेने सुरू करण्यात आली होती. जरी प्राचार्य शहा यांनी उपस्थितांची जाहीरपणे माफी मागितली आणि भविष्यात शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात व मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येईल, अशी हमी देऊन हात जोडून दिलगिरी व्यक्त केली असली, तरी हा वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या रोषाची धार अजूनही कमी झालेली नसून ते मुख्याध्यापकाला काळ लावण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. यातील मुख्याध्यापक शहा यांनी हात जोडून दिलगिरी व्यक्त केल्याने तुर्तास गाव बंद की निषेध आंदोलन करायचे..? यावर कार्यकर्त्यांत चर्चा सुरू आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
