दिनांक ३० डिसेंबर २०२४, उरुळी कांचन (पुणे)/श्रीगोंदा:
उरुळी कांचन गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेऊन घातपात करण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता. २९) रात्री उघडकीस आला. रेल्वे विद्युत पोल किलोमीटर क्रमांक २१९/७-५ जवळ पुणे बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी हा प्रकार उघड झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

रात्री पाऊणे अकराच्या सुमारास रेल्वे ट्रॅकच्या निरीक्षणादरम्यान हा संशयास्पद गॅस सिलेंडर आढळला. सिलेंडर प्रिया गोल्ड कंपनीचा छोट्या आकाराचा असून, तो ३९०० ग्रॅम वजनाचा आणि गॅसने भरलेला होता. या प्रकारामुळे रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

श्रीगोंद्यातील रहिवाशी शरद शहाजी वाळके (वय ३८, ह.रा. सार्थक रेसिडेन्सी, वाघोली, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरुळी कांचन पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला असून, या प्रकरणातील संशयितांचा शोध घेतला जात आहे.

रेल्वे ट्रॅकवरील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी खबरदारीचे उपाय केले आहेत. याशिवाय, रेल्वे प्रशासनालाही याबाबत सतर्क करण्यात आले आहे. रेल्वे मार्गावर गस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

