दिनांक २८ डिसेंबर २०२४,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात एका २४ वर्षीय युवकाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी सुरज बाळासाहेब पारधे (रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मारहाणीचे व जातीवाचक अपमानाचे गंभीर आरोप केले आहेत.

दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुरज पारधे हे काष्टी येथील थिएटरला जाण्यासाठी मित्राच्या मोटरसायकलवरून (होंडा शाईन एमएच १६ सीटी ९८५८) निघाले होते. श्रीगोंदा-काष्टी रस्त्यावरील ऑस्करवाडी मिसळजवळ त्यांची मोटरसायकल लिंपणगाव येथील उमेश वेताळ याच्या मोटरसायकलशी भिडली. या प्रकरणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीत झाले.

सुरज पारधे यांनी मोटरसायकलवरून कट मारल्याबद्दल विचारणा केली असता, उमेश वेताळ व त्याच्यासोबत हर्षद ताम्हाणे यांनी सुरज यांना शिवीगाळ करत गचांडी धरून खाली पाडले. यावेळी अजून दोन मोटरसायकलींवरून आरोपींचे साथीदार किरण गायकवाड, ओम शातांराम धोत्रे, रोहित साहेबराव शिंदे, आणि महेश वाघमोडे घटनास्थळी पोहोचले.

आरोपींनी जातीवाचक शब्द वापरून सुरज यांचा अपमान केला व त्यांच्यावर लोखंडी गज, लाकडी दांडके, आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. यामध्ये सुरज यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले आहे.
घटनेनंतर सुरज यांनी दाजी अविनाश घोडके व अन्य नातेवाईकांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सुरज यांना श्रीगोंदा पोलिस स्टेशनला नेण्यात आले, जिथे प्राथमिक माहिती नोंदवून औषधोपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालय आणि कळमकर हॉस्पिटल येथे उपचार करून त्यांचा हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सुरज पारधे यांच्या फिर्यादीवरून उमेश वेताळ, हर्षद ताम्हाणे, किरण गायकवाड, ओम धोत्रे, रोहित शिंदे, आणि महेश वाघमोडे या सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधान, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्रोत:(फिर्याद)
