दिनांक २७ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:
राजगुरूनगर, ता. जि. पुणे येथे मंगळवार, दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी भटक्या विमुक्त समाजातील दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अमानुष अत्याचाराने माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कु. कार्तीकी सुनिल मकवाने व कु. दुर्वा सुनिल मकवाने या दोन मुलींवर नराधमाने अत्याचार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे.

सदर मुलींचे आई-वडील, सुनील मकवाने आणि त्यांची पत्नी, भंगार गोळा करून उदरनिर्वाह करत होते. या भटक्या समाजाला गेली सत्तर वर्षे स्थिरता लाभलेली नाही. गावोगावी भटकंती करत या समाजाने जगण्यासाठी संघर्ष केला, मात्र स्थायी निवारा किंवा पुनर्वसनाच्या अभावी ते नेहमीच वंचित राहिले आहेत. शासनाच्या अपयशामुळे या समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना यावेळी समाजबांधवांनी व्यक्त केली.

या घटनेमुळे भटक्या विमुक्त समाजाच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनास सादर करण्यात आलेल्या निवेदनात आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

स्थानिक तहसील कार्यालयात मा. तहसीलदार यांना निवेदन देताना संजय सावंत, तानाजी सावंत, नितीन भाऊ सोनवणे, सायबू सावंत, संतोष शिंदे, सुदाम सावंत, शिवराम शिंदे, अमोल सावंत, विशाल वायकर, गणेश भोसले, अक्षय शेखर आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)

