बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश..

दिनांक २६ मार्च २०२६,अहिल्यानगर:

समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्याबाबत पसरणाऱ्या अफवा आणि त्यातून निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आता कोणत्याही पेट्रोल पंपावर सुट्टे पेट्रोल किंवा डिझेल देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल किंवा डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरून द्यावे. प्लास्टिक बाटल्या, कॅन, डबे किंवा इतर कोणत्याही अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन भरून देण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवावी आणि इंधन विक्रीच्या नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पंप मालकांवर किंवा व्यक्तींवर ‘पेट्रोलियम नियम २००२’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ आणि ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

स्रोत:(dio)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading