श्रीगोंदा परिसरातील अवैध देहविक्री व्यवसायावर कडक कारवाईची भीमछावा संघटनेची मागणी..

दिनांक ११ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

नगर-सोलापूर महामार्गावरील श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून खुलेआम अवैध देहविक्री व्यवसाय चालवणाऱ्या लॉजिंग व हॉटेल मालकांवर तसेच बाहेरील राज्यांतून तस्करी करून आणलेल्या महिलांवर जबरदस्ती करणाऱ्या दलालांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

भीमछावा संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष चेतन साठे यांच्या पुढाकारात देण्यात आलेल्या निवेदनात, या अवैध वेश्याव्यवसायामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. स्थानिक महिलांना सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली जात असून, हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायात होणारी ही गैरकृत्ये समाजावर गंभीर परिणाम करत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

सदर अवैध धंद्यांत नेपाळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि बांगलादेश येथून मुलींची फसवणूक करून त्यांना या व्यवसायात ओढले जात असल्याची माहिती मिळाली आहे. दलालांकडून या मुलींची विक्री होऊन त्यांना जबरदस्तीने देहविक्रीस प्रवृत्त केले जात आहे. यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांची संलग्नता असल्याची शंका उपस्थित केली जात आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

या प्रकरणात श्रीगोंदा पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून, हॉटेल व लॉजिंगमध्ये तपास करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज, रजिस्टर व आलेल्या-गेलेल्या ग्राहकांची माहिती तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षण घेत असलेल्या मुलींना फसवून त्यांचे शोषण होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, ज्यामुळे विद्यार्थी वर्गाचे भविष्य धोक्यात आले आहे.

सदर निवेदन पोलीस प्रशासनाला चेतन साठे, राहुल छत्तीसे, आणि अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले असून, या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्रोत:(निवेदन)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading