अनधिकृत वाळू उत्खननाने श्रीगोंदा तालुक्यात हाहाकार: प्रशासनाचे दुर्लक्ष..

दिनांक १२ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, राजापूर, आणि माठ या गावांच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असून, विनापरवाना वाळू तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वारंवार माहिती दिल्यानंतरही महसूल आणि पोलिस प्रशासनाने कारवाईसाठी टाळाटाळ केल्याचे आरोप होत आहेत.

मागील काही महिन्यांपासून या गावांच्या नदीपात्रांमध्ये वाळू माफियांनी उत्खननाचे काम खुलेआम सुरू केले आहे. चिंचणी आणि शिरूर हद्दीतील नदीपात्रांमध्येसुद्धा वाळूचे अवैध उत्खनन होत असून, स्थानिक प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. दररोज दहा, पंधरा पेक्षा जास्त ट्रक वाळू वाहतूक करत आहेत आणि सहा ते सात बोटी व हायड्रॉलिक फायबर नौकांचा वापर करून हे अनधिकृत काम निर्भयपणे सुरू आहे.

वाळू उत्खननाच्या या समस्येला घेऊन स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खुलेआम चाललेल्या या अनधिकृत तस्करीला रोखण्याऐवजी महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

नदीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खननामुळे मच्छीमारांवर परिणाम होत असल्याने त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र, त्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वाळू माफियांशी साटेलोटे करत असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा नदीपात्रांतील नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होऊन पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीवरून)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading