पिंपरी कोलंदर येथे वाळू माफियावर हल्ला: सहा जणांवर गुन्हा दाखल..

दिनांक २४ डिसेंबर २०२४,श्रीगोंदा:

तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात रविवारी (दि. २२ डिसेंबर) सायंकाळी वाळूमाफियावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली.

हल्ल्यानंतर जखमी व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास सुरू असून सोमवारी (दि. २३ डिसेंबर) रात्री उशिरा बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप गुलाब खेडकर (वय ३२, रा. म्हसे, ता. श्रीगोंदा) हे २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता म्हसे ते पिंपरी कोलंदर रस्त्यावर दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची चारचाकी गाडी व बुलेट दुचाकीला आडवी लावली. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवत पिस्टलचा धाक दाखवून कोयत्याने वार करत संदीप खेडकर यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्याकडील खिशातील ३० हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली.

संदीप खेडकर यांच्या तक्रारीवरून बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये गणेश रामभाऊ दिवेकर, दादा मोहरे, विशाल लक्ष्मण देवीकर, अवी जर्जीळ, विजय भाऊसो देवीकर आणि एक अनोळखी व्यक्ती यांचा समावेश आहे. सर्व आरोपी म्हसे (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी आहेत.

या प्रकरणाचा तपास बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मारुती कोळपे करत आहेत. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

नमूद हल्ल्यामुळे पिंपरी कोलंदर परिसरात एकच खळबळ उडाली असून वाळूमाफियांवरील हल्ल्यांचे प्रकार थांबवण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबाव वाढला आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading