दिनांक २३ जुलै २०२६ श्रीगोंदा/अहिल्यानगर:
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात बँक खाती भाड्याने देणाऱ्यांविरोधात अहिल्यानगर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आमिषाला बळी पडून सायबर गुन्हेगारांना स्वतःची बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या १२ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील खातेदारांचाही समावेश आहे.

सायबर गुन्हेगार नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती भाड्याने घेतात. या खात्यांचा वापर देशभरातील नागरिकांची फसवणूक केलेली रक्कम जमा करण्यासाठी केला जातो, अशा खात्यांना ‘म्युल अकाउंट्स’ (Mule Accounts) म्हटले जाते.
अहिल्यानगर शहर, संगमनेर, शिर्डी, राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यातील १२ जणांच्या खात्यांतून ४० लाख रुपयांहून अधिकची रक्कम एटीएम किंवा धनादेशाद्वारे काढून ती गुन्हेगारांपर्यंत पोहोचवण्यात आली होती.
जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

फसवणुकीची रक्कम स्वतःच्या खात्यात स्वीकारणारे खातेधारक हे थेट ‘सहआरोपी’ ठरतात, त्यामुळे बँक खाते कोणालाही भाड्याने देऊ नका किंवा कशाच्याही मोहात पडू नका, असा इशारा सायबर विभागाने दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
