दिनांक १७ जून २०२६,श्रीगोंदा:
चारित्र्याच्या संशयावरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लोखंडी रॉड व फर्शीने डोक्यात मारून निर्घृण खून केल्याची आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा शहरात उघडकीस आली आहे.
याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी, त्याचे वडील आणि आई यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (पीआय) किरण शिंदे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच या अल्पवयीन मुलीचा जीव गेल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक वर्तुळातून केला जात आहे.
A 17-year-old girl was murdered and her body was burned in Srigondya; Was the girl’s death due to the negligence of the then PI Kiran Shinde? Sensational allegation by the Bahujan Samata Party..
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी गेल्या काही महिन्यांपासून श्रीगोंद्यातील काळकाई चौक परिसरात मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ याच्यासोबत राहत होती. त्यांच्यात वारंवार वाद होत असत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास काळकाई चौक येथील राहत्या घरी चारित्र्याच्या संशयावरून आरोपी शुभम आणि पीडित मुलगी यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून रागाच्या भरात आरोपीने मुलीला लोखंडी रॉडने मारहाण केली आणि फर्शीने डोक्यात प्रहार करून तिचा जागीच खून केला. खून केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह घरातच लपवून ठेवला आणि तो अहमदनगर जवळील केडगाव येथे राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे निघून गेला.

यानंतर, १६ जून रोजी सकाळी मुख्य आरोपी आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ हे श्रीगोंद्यातील घरी आले. त्यांनी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीने बांधला.
१७ जूनच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा मृतदेह मोटारसायकलवरून वडाळी रोडवरील जंगलात नेला. तिथे लाकडे गोळा करून आणि पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून दिला.
पीडित मुलीच्या आईला पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेप्रकरणी मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ, त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ आणि आई रेखा ओव्हाळ यांच्यासह अन्य संशयित साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर श्रीगोंद्यातील सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत असून, तत्कालीन पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.
पीआय किरण शिंदे यांना जबाबदार धरा – वसंतराव सकट
“श्रीगोंदा तालुक्यात आजवर अनेक मातंग समाजाच्या मुली व महिलांचे अपहरण झाले आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक (पीआय) किरण शिंदे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अनेक दखलपात्र तक्रारी न घेतल्याने अनेक मुलींना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. या मृत मुलीच्या बाबतीतही एप्रिल २०२६ मध्ये असाच हलगर्जीपणा झाला. आरोपीने तिला घरातून जबरदस्तीने नेऊन मारहाण व अत्याचार केल्याची तक्रार देण्यासाठी तिची आई पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, तत्कालीन पीआय किरण शिंदे यांच्या कार्यकाळात केवळ मेडिकल यादी देऊन तक्रार घेण्यास नकार देण्यात आला, ज्यामुळे या पीडित कुटुंबावर अन्याय झाला. जर त्याच वेळी पोलिसांनी तत्परतेने तक्रार नोंदवून कारवाई केली असती, तर आज या मुलीचा जीव वाचला असता. या हलगर्जीपणाला पीआय किरण शिंदे हेच जबाबदार आहेत,” असा घणाघाती आरोप बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी केला आहे.
दरम्यान, घटना उघडकीस आल्यानंतर वर्तमान पोलीस निरीक्षक (पीआय) संजय ठेंगे यांनी तातडीने आपली चक्रे फिरवून, संपूर्ण यंत्रणा कामाला लावून घटनेची सखोल चौकशी केली व आरोपींना अटक केली, याबद्दल सकट यांनी समाजाच्या वतीने वर्तमान पोलीस प्रशासनाचे आभारही मानले आहेत.या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेमुळे तालुक्यातील तत्कालीन पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्रोत:(फिर्याद)
