श्रीगोंद्यात धारदार कोयत्याचा धाक दाखवून लुटणारा जेरबंद; श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई..

दिनांक १७ जून २०२६ श्रीगोंदा:

औषध आणण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीला अडवून मारहाण करत लुटणाऱ्या आणि विचारणा करण्यास गेलेल्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका अट्टल आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. पियुष बाळासाहेब घोडके (रा. सिद्धार्थ नगर, श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या एका अनोळखी साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक १६ जून २०२६ रोजी रात्री २:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी रुपाली नितीन वायदंडे (रा. ससाणे नगर, श्रीगोंदा) यांचे पती नितीन वायदंडे यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने ते औषध आणण्यासाठी मेडिकल कडे जात होते. ते सिद्धार्थ नगर परिसरात आले असता, आरोपी पियुष घोडके आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराने त्यांना रस्त्यात अडवले.

पैसे देण्याच्या कारणावरून आरोपींनी नितीन वायदंडे यांना जबर मारहाण केली व त्यांच्या जवळील १,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच त्यांना घाणरडी शिवीगाळ केली.

या प्रकारानंतर फिर्यादी रुपाली वायदंडे या आरोपीला विचारणा करण्यासाठी गेल्या असता, आरोपी पियुष घोडके याने त्यांनाही अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. एवढेच नाही तर हातातील धारदार कोयता दाखवून ‘जीवे ठार मारू’ अशी धमकी दिली आणि मोबाईलमध्ये शूटिंग करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गु.र.नंबर ६११/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये जबरी चोरी आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपी पियुष घोडके याला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेकॉ. आप्पा तरटे करत आहेत.

सदरची कामगिरी अहमदनगरचे माननीय पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत, महादेव कोहक, विवेक दळवी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला उबाळे यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या त्वरित कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading