दिनांक ३० मे २०२६, श्रीगोंदा/पुणे:
पुण्यात विषारी दारू पिल्याने तब्बल १३ निरपराध लोकांचा नाहक बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, आता स्थानिक पोलिसांसह शेजारील जिल्ह्याच्या पोलीस कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.

या भीषण दुर्घटनेनंतर उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने छापे टाकून १ लाख १२ हजारांचे रसायन जप्त केले असले, तरी या निमित्ताने एका मोठ्या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे शेजारील जिल्ह्यात रुजलेली असून, आता श्रीगोंदा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
उरुळी कांचन, शिंदवणे आणि भवरापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीची दारू तयार केली जाते आणि ती पुणे शहर व पिंपरी-चिंचवड भागात पुरवली जाते. मात्र, धक्कादायक बाब अशी की, या बेकायदेशीर व्यवसायाचे मुख्य केंद्र श्रीगोंदा येथे असल्याचे समोर येत आहे.

“श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथे मोठ्या प्रमाणावर तयार केली जाणारी घातक हातभट्टी दारू पुणे शहर आणि परिसरात राजरोसपणे वाहतूक करून आणली जाते,” अशी चर्चा आता नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर श्रीगोंदा येथून दारूची तस्करी होत असताना, तिथल्या स्थानिक पोलिसांना याची गंधवार्ता कशी नाही? की जाणूनबुजून याकडे डोळेझाक केली जात आहे? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे.
पुण्यात १३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर जर पुणे पोलीस जागे होऊ शकतात, तर मग श्रीगोंदा जिल्हा पोलीस या तस्करांवर आणि मुख्य सुत्रधारांवर कारवाईचा बडगा कधी उचलणार, असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणातील दोन्ही फरार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यात निष्पाप लोकांचे बळी गेल्यानंतरच पोलिसांना जाग का येते? श्रीगोंदा परिसरातून येणारी दारू रोखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस कोणती पावले उचलणार? केवळ दाखवण्यापुरती कारवाई करून काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होणार का?
श्रीगोंदा येथे हातभट्टी तयार करणाऱ्या माफियांचे आणि पुणे परिसरातील ‘हातभट्टीच्या दादा’चे आर्थिक हितसंबंध नेमके कोणाशी जोडलेले आहेत, याचा शोध घेऊन श्रीगोंदा पोलिसांनी आता तरी कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
स्रोत:(ऑनलाईन माहिती नुसार)
Ai genreted फोटो आहे.















Leave a Reply