सत्ताधाऱ्यांचा ‘अदृश्य’ दबाव की नियोजनाचा अभाव.? श्रीगोंद्यात बंदला अल्प प्रतिसाद, विद्यार्थ्यांकडून मात्र तीव्र निषेध..!

दिनांक २३ जुलै २०२६,श्रीगोंदा:

आज दिनांक २३ जुलै २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी आणि इतर पुरोगामी व समविचारी संघटनांनी पुकारलेल्या बंदला श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शहराची बाजारपेठ आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असल्याने बंदचा विशेष प्रभाव कुठेही दिसून आला नाही.

याउलट, दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नीट (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेत शहरातून रॅली काढली आणि तहसीलदारांना निषेध निवेदन सादर केले.

श्रीगोंदा शहराने यापूर्वी विविध सामाजिक मुद्द्यांवर पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र, आजच्या बंदच्या उदासीनतेमागे अनेक गुंतागुंतीची कारणे दिसून येत आहेत.

नीट पेपरफुटी प्रकरणातील आंदोलनासाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाकडून आणि शिक्षकांकडून स्पष्टपणे प्रतिबंध करण्यात आला होता, ज्यामुळे विद्यार्थी वर्गाच्या सहभागावर मर्यादा आल्या.

ज्या संघटनांनी हा बंद पुकारला होता, त्यातील बहुतांश पदाधिकारी हे तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत. दळणवळणाच्या किंवा स्थानिक अडचणींमुळे ते आजच्या आंदोलनात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि सत्तेच्या चाव्या सध्या भाजपच्या हाती आहेत. भाजप विरोधातच हा बंद पुकारला गेल्याने स्थानिक सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक गट या आंदोलनापासून पूर्णपणे लांब राहिले.

नेहमी आंदोलनांच्या वेळी सक्रिय असणारी व्यापारी संघटना आज या प्रक्रियेपासून अनभिज्ञ राहिल्याने बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही.

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आजच्या आंदोलनात अपेक्षित असलेले नेतृत्व करताना दिसले नाहीत, त्याचाही परिणाम एकूण प्रतिसादावर झालेला दिसतो.

शहरात बंदचा प्रभाव नसला तरी, नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी एम.जे.एस. (MJS) कॉलेजपासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली. या रॅलीमध्ये केवळ विद्यार्थीच नव्हे, तर विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या शेवटी शिष्टमंडळाने श्रीगोंदा तहसीलदारांना नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून होत असलेल्या कथित दुर्लक्षाबाबतचा विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवून निवेदन सादर केले.

एकूणच या आजच्या बंद आणि आंदोलनावर सत्ताधाऱ्यांचा ‘अदृश्य’ दबाव होता की, खरोखरच नियोजनाचा अभाव.? हे समजू शकले नाही..

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading