श्रीगोंदा, दि. १९ ऑगस्ट २०२६:
मराठा समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह, अवमानकारक व समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात अखंड मराठा समाज व संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा तालुका यांच्या वतीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने सार्वजनिकरित्या तसेच माध्यमांच्या माध्यमातून मराठा समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या वक्तव्यामुळे समाजातील महिला व नागरिकांच्या भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या असून, अशा वक्तव्यांमुळे समाजामध्ये गैरसमज, वैमनस्य व सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील संबंधित व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, सोशल मीडिया पोस्ट तसेच प्रसारित झालेल्या माध्यमांची सखोल चौकशी करून सत्यता पडताळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित वक्तव्याची कायदेशीर तपासणी करून, लागू असलेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) व इतर संबंधित कायद्यांनुसार योग्य त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखंड मराठा समाज व संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

महिलांचा सन्मान आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे समाजातील कोणत्याही घटकाच्या महिला किंवा नागरिकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख इंजि शामभाऊ जरे, तालुकाध्यक्ष दिलीप लबडे, आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष राजेंद्र नागवडे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आनंद औटी, आनंद लगड, कचरू वागसकर यांच्यासह इ कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(अखंड मराठा समाज व संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा तालुका, जि. अहिल्यानगर)
