शिरूर / श्रीगोंदा | २० ऑगस्ट २०२६:
शिरूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील दोघा संशयितांकडून २० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) पावडर जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरूर गावच्या हद्दीतील मार्वल कम्फर्ट (सुरज) लॉजिंगमधील रूम क्रमांक २०९ मध्ये काही जण अंमली पदार्थ बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवार (१९ ऑगस्ट) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सदर लॉजिंगवर छापा टाकला.
झडतीदरम्यान आरोपींच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने आणलेले २० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन आढळले. शिरूर परिसरातील ही दुसरी मोठी कारवाई मानली जात असून, यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मेफेड्रॉन (एम.डी.): ४ लाख रुपये किमतीची २० ग्रॅम पावडर आहे.

५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ कार (एमएच-१६ बीएम-९१००) तसेच
सॅमसंग ए-३४ ५जी व व्हिवो एक्स-२०० एफई (अंदाजे प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीचे).
अमोल पोटावळे याच्याकडे १९ रिकाम्या प्लास्टिकच्या पिशव्या.
(जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ९ लाख १० हजार रुपये आहे.)
या प्रकरणी खालील दोन जणांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
१. दादा धावडे (वय २७, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)
२. अमोल राजाराम पोटावळे (वय ३५, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २१(ब), २२(ब) नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लॉजिंग आणि हॉटेल्सच्या आडोशाने चालणाऱ्या अशा गैरप्रकारांवर पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी, अशी तीव्र अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. हा अंमली पदार्थ नेमका कुठून आणला गेला आणि यामागे आणखी कोणाचे रॅकेट कार्यरत आहे का, याचा कसून तपास शिरूर पोलिसांकडून केला जात आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
