दिनांक २७ जुलै २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तहसील कार्यालयात संविधानाबद्दल वादग्रस्त विधान करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले तहसीलदार सचिन डोंगरे यांनी अखेर आज आंदोलकांसमोर जाहीर माफी मागितली आहे. ‘मी भारताचे संविधान मानत नाही’ असे विधान केल्यामुळे संतप्त झालेल्या विविध संविधान प्रेमी आणि पुरोगामी संघटनांनी आज तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तीव्र निषेध आंदोलन केले. या दबावामुळे आणि आंदोलकांच्या प्रखर मागणीनंतर तहसीलदार डोंगरे यांनी दिलगिरी व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली.

तहसीलदारांच्या वादग्रस्त विधानानंतर आज २७ जुलै २०२६ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयात संविधान प्रेमी आणि पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, bsp चे सुनील ओहळ, बहुजन समता पक्षचे वसंत सकट, भगवान गोरखे, पत्रकार चंदन घोडके, मुकुंद सोनटक्के, पत्रकार अमोल झेंडे, पत्रकार अमर घोडके, राजेंद्र नागवडे, मुकुंद सोनटक्के, भीमराव घोडके, पत्रकार सचिन शिंदे, पत्रकार संदीप उमाप, पार्थ जजाळ, अजित भोसले आणि संजय रणशिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखी होऊन तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या निलंबनाची मागणी केली आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

आंदोलनाची तीव्रता पाहून तहसीलदार सचिन डोंगरे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. त्यावेळी आपली चूक मान्य करत तहसीलदार डोंगरे म्हणाले की, “माझे तहसीलदार पद हे संविधानामुळेच मिळाले आहे आणि मी संविधानानुसारच कामाला लागलो आहे. माझ्या तोंडून जे शब्द गेले, त्याबद्दल मी सर्वांची जाहीर माफी मागतो.” त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर तात्पुरता पडदा पडला आणि आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
तहसीलदारांनी माफी मागितली असली तरी, त्यांच्या पूर्वीच्या कार्यपद्धतीबद्दल आणि विशेषतः मुळशी येथील लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्रोत:(आंदोलन)
