माहेरची १० एकर जमीन नावावर करून देण्यासाठी विवाहितेचा छळ; सासरच्या ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दिनांक ३० जुलै २०२६ अहिल्यानगर:

माहेरची १० एकर जमीन आपल्या नावावर करून देण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध सोमवारी (२७ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घोसपुरी येथील २९ वर्षीय पीडित महिलेचा विवाह तोंडेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील मिठू बाळासाहेब तोंडे याच्याशी झाला होता. ६ जून २०२० ते १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पीडिता आपल्या सासरी राहत होती. या वास्तव्यादरम्यान आरोपींनी तिला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला.

आरोपींनी पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केली. तसेच, अनेकदा उपाशी ठेवत तिचा छळ केला. “तुझ्या माहेरची १० एकर जमीन पतीच्या नावावर करून दे, तरच तुला नांदवू,” अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू ठेवला. अखेर, तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले.

हुंडाबळी आणि छळाच्या या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. आपल्या पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध तिने फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित चारही संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading