श्रीगोंदा येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार बंद करण्याचे आदेश..



अहिल्यानगर, दि. २१ :

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बारमध्ये अनैतिक व्यापार चालविला जात असल्याचे उघडकीस आल्याने अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने  श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केला आहे.

अहिल्यानगर ते दौंड मार्गावरील काष्टी येथील या हॉटेलमध्ये मालक व चालकाकडून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांच्याकडून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात उरुळी कांचन, चेंबूर, नालासोपारा, वाघोली, वाशी, भिवंडी आणि कलकत्ता येथील सात पीडित महिलांचा समावेश असून, रणजित राम पुजारी, मुकेशकुमार गुरुदयाल यादव, नागनाथ लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर रमेश मुळीक, संदीप अशोकराव पाचपुते व किर्थिश सुधाकर हेगडे यांच्यासह शिरूर येथील एका ग्राहकाविरुद्धही श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित आस्थापनेवर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. यासाठी १५ जून व १९ जून रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, संबंधित सुनावणीस गैरहजर राहिले. पोलीस विभागाच्या अहवालानुसार संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित व कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही संबंधित आस्थापनेचा अशा बेकायदेशीर कृत्यासाठी वापर झालेला असून, भविष्यात पुन्हा अशा प्रकारे वापर होऊ नये, यासाठी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, भविष्यात या जागेचा पुन्हा अनैतिक व्यापार अथवा कुंटणखान्यासाठी वापर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मूळ जमीन व घरमालकाची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

स्रोत :(dio)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading