दिनांक १८ जुलै २०२६, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात १७ जून रोजी उघडकीस आलेल्या एका भीषण आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. चारित्र्याच्या संशयावरून अवघ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लोखंडी रॉड व फर्शीने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला.
केवळ एवढ्यावरच न थांबता, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह शहराजवळील जंगलात नेऊन जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
या घटनेला महिना उलटून गेला तरी, मुख्य आरोपींपैकी महिला आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाताला लागलेली नाही, ज्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी गेल्या काही महिन्यांपासून श्रीगोंद्यातील काळकाई चौक परिसरात मुख्य आरोपी शुभम ओव्हाळ याच्यासोबत राहत होती.
त्यांच्यात वारंवार होणाऱ्या वादातून, १५ जून २०२६ रोजी शुभमने मुलीचा निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह लपवून तो केडगावला आपल्या आई-वडिलांकडे गेला. १६ जून रोजी आरोपी शुभम आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ यांनी मृतदेह गादीत गुंडाळून, १७ जूनच्या मध्यरात्री वडाळी रोडवरील जंगलात पेट्रोल टाकून पेटवून दिला होता.
याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी शुभम ओव्हाळ, त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ आणि आई रेखा ओव्हाळ यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर पुरुष आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी, रेखा ओव्हाळ ही महिला आरोपी अजूनही पोलिसांच्या अटकेपासून दूर आहे. याबाबत विचारणा केली असता, “आमचे पथक तपास करत आहे,” असे उत्तर पोलिसांकडून मिळत आहे. मात्र, महिन्याचा कालावधी लोटूनही मुख्य महिला आरोपीला अटक न झाल्याने श्रीगोंद्यातील सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ही मागासवर्गीय समाजातील एका तरुणीच्या बाबतीत घडलेली अत्यंत गंभीर घटना असतानाही पोलीस यंत्रणा जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे. “दोन पुरुष आरोपी अटक होतात, मग महिला आरोपीला अटक करण्यास विलंब का? यामागे पोलीस प्रशासनाची काही ‘अर्थपूर्ण’ तडजोड आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
अल्पवयीन मुलीचा जीव घेणाऱ्या आणि क्रूरतेने पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करून, फरार महिला आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी आता समाजाकडून जोर धरू लागली आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
