श्रीगोंदा | १९ जुलै २०२६
श्रीगोंदा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात कार्यरत असलेले विकील बहुरे आणि त्यांच्यासोबत असलेले कुकडी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी रामचंद्र बहुरे या दोघांचा पाटोदा (ता. जामखेड) जवळ झालेल्या भीषण अपघातात पहाटेच्या सुमारास जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विकील बहुरे आणि रामचंद्र बहुरे हे दोघेही औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. हे दोघेही जामखेडकडून ५४८ डी (548 D) महामार्गाने श्रीगोंद्याच्या दिशेने येत होते.
यावेळी रस्त्यावर झालेल्या खोदकामामुळे समोरून अचानक आलेल्या वाहनाला वाचवण्याचा प्रयत्न करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोदलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

विकील बहुरे हे श्रीगोंदा तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात अत्यंत कार्यक्षमतेने आपली सेवा बजावत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. एकाच वेळी दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील अपूर्ण काम आणि सुरक्षेचा अभाव या अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
