थरारक! श्रीगोंद्यात शेतकऱ्याच्या उशाशी बसला ‘काळ’; समयसूचकतेमुळे वाचले प्राण.

दिनांक २१ मार्च २०२६ श्रीगोंदा :

तालुक्यातील तांदळी दुमाला येथे एका तरुण शेतकऱ्याचा बिबट्याशी समोरासमोर सामना झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी शेतातील ट्रॉलीत झोपलेल्या तरुणाच्या पायाशी चक्क बिबट्या येऊन बसला होता, मात्र तरुणाने दाखवलेल्या कमालीच्या धैर्यामुळे आज त्याचे प्राण वाचले.

तांदळी दुमाला येथील एक तरुण शेतकरी रात्री गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. पहाटे चारच्या सुमारास बिबट्यापासून संरक्षण व्हावे म्हणून तो शेतातील एका ट्रॉलीमध्ये विसावला. काही वेळाने त्याला पायापाशी हालचाल जाणवली, पांघरुण बाजूला सारून पाहिले असता समोर साक्षात बिबट्या बसलेला दिसला.

अंगाचा थरकाप उडवणारी परिस्थिती असतानाही त्या तरुणाने आरडाओरडा न करता किंवा कोणतीही हालचाल न करता शांत राहण्याचा निर्णय घेतला. काही मिनिटे हा थरार सुरू होता. अखेर बिबट्या स्वतःहून ट्रॉलीतून उतरून निघून गेल्याने मोठी दुर्घटना टळली.

“काळ आला होता पण वेळ आली नव्हती,” अशीच काहीशी भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.

ऊस तोडणी झाल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा उरलेली नाही, परिणामी ते मानवी वस्तीकडे वळत आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात घबराट पसरली असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading