खळबळजनक: श्रीगोंद्यातील या प्रशासकीय कार्यालयात ८० टक्के कर्मचाऱ्यांचे ‘बदली’चे अर्ज; वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून उचलले पाऊल..?

दिनांक २१ मार्च २०२६ श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहराच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन कामाशी संबंधित असलेल्या एका मुख्य शासकीय कार्यालयात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कार्यालयातील वरिष्ठ प्रमुख अधिकाऱ्याच्या मनमानी आणि जाचक कारभाराला कंटाळून तब्बल ७२ कर्मचाऱ्यांनी आपले बदलीचे अर्ज सादर केले आहेत.

या धक्कादायक प्रकारामुळे तालुक्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, शासकीय कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण ८५ ते ८६ जण कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून या कार्यालयाच्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना दिली जाणारी वागणूक चर्चेचा विषय ठरली होती.

हा वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांचा सातत्याने अवमान करणे, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण टाकणे आणि नियमानुसार मिळणाऱ्या हक्काच्या सुट्ट्या नाकारणे अशा विविध मार्गांनी त्रास देत आहे.

कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून न घेता केवळ आदेशांची अंमलबजावणी करण्याची सक्ती केली जात आहे.

कौटुंबिक किंवा वैद्यकीय कारणांसाठी लागणाऱ्या सुट्ट्याही नाकारल्या जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी बदलीची मागणी केल्याने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण होणार आहे. जर या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या, तर श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडणार आहेत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ‘जाचक’ अधिकाऱ्यावर काय कारवाई करते की कर्मचाऱ्यांच्या बदल्या मंजूर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading