श्रीगोंदा येथील वृद्ध शेतकरी खून प्रकरणातील फरार आरोपीला १२ तासांत अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मढी शिवारात धडक कारवाई

दिनांक १४ जून २०२६ अहिल्यानगर:

श्रीगोंदा येथील खळबळजनक वृद्ध शेतकरी खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अहिल्यानगर यांनी अवघ्या १२ तासांच्या आत मढी शिवारातून बेड्या ठोकल्या आहेत. शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादातून हा निर्घृण खून करण्यात आला होता.

श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीतील पिसोरेखांड येथे शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादातून आरोपी विलास दादा गावडे (वय ५५ वर्षे, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याने मयत पोपटराव रावजी गावडे (वय ७५ वर्षे, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा) यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने वार करून त्यांचा निर्घृण खून केला होता.

या घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३, ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. हरिश भोये यांना आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोउपनि संदीप मुरकुटे, अनंत सालगुडे, परिविक्षाधीन पोउपनि पुष्कर कडू, सचिन भाबड आणि पोलीस अंमलदारांची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

दिनांक १२/०६/२०२६ रोजी पथक आरोपीचा शोध घेत असताना, आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी आपले अस्तित्व लपवून मढी मायंबा शिवार (ता. पाथर्डी) परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने तात्काळ मढी गड परिसरामध्ये अत्यंत गोपनीयतेने शोधमोहीम राबवून आरोपी विलास दादा गावडे यास मढी गडावरून शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यातील आरोपीस पुढील तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून त्यास अधिकृतरीत्या अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करत आहे.

सदरची यशस्वी कारवाई मा. श्री. मुम्मका सुदर्शन (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) व मा. श्री. वैभव कलुबर्मे (अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading