विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांच्या दलित व आदिवासी समाजविरोधी वक्तव्याचा निषेध..

दिनांक २३ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच दलित व आदिवासी समाजाबाबत विधानसभेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप होत असून, समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा जाहीर निषेध करत श्रीगोंदा तालुक्यातील दलित व आंबेडकरी समाजाने आज तहसीलदारांना निवेदन दिले.

निवेदनकर्त्यांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचा संदर्भ देत आमदार पाचपुते यांनी केलेले विधान समाजविरोधी असल्याचा आरोप केला आहे. या वक्तव्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा अपमान झाल्याचे त्यांनी सांगितले. “आंबेडकरी समाजाला अपमानित करून टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांकडून होत आहे,” असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला.

निवेदनामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विद्यमान आमदार पाचपुते यांच्या विरोधात ३२ गुन्हे नोंदवले गेले आहेत. तरीही त्यांनी दलित समाजावर खोट्या गुन्ह्यांचे आरोप करत कायद्याचा गैरवापर होत असल्याचे विधान केले. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे बुडवले तसेच कामगारांचे पगार रोखून त्यांच्या कुटुंबांना हालापेष्टांना सामोरे जावे लागले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

निवेदनकर्त्यांनी सांगितले की, “आमदार पाचपुते यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे बुडवले, कामगारांचे पगार थकवले. त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होण्याची वेळ आली. या अन्यायाविरोधात अहिल्यानगरसह चार जिल्ह्यांतील लोकांनी आंदोलन केले.”

दलित व आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत केवळ खोट्या आरोपांवर आधारलेली विधाने करणे हे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे. निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, “श्रीगोंदा येथील ॲट्रॉसिटीचे गुन्हे राजकीय सूडभावनेतून दाखल करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदार पाचपुते यांच्यावर कारवाई करावी.”

निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, भीमराव घोडके, नितीन जावळे, अंबादास घोडके, ऑल इंडिया पँथर सेनेचे अमर घोडके, संजय राजसिंग, पवन रणदिवे, बहुजन मुक्ती पार्टीचे राहुल छत्तीस, अविनाश घोडके, सत्यवान शिंदे, (पत्रकार)चंदन घोडके, (पत्रकार) अमोल झेंडे, कालिदास सावंत, कचरू लष्करे, संतोष भोसले(आदिवासी संघटना), सचिन शिंदे(मातंग एकता), ज्ञानदेव शिरवाळे, रामसिंह भोसले, सचिन घोडके इत्यादी सह बहुजन समाज पार्टी, ऑल इंडिया पॅंथर सेना, मातंग एकता महाराष्ट्र, सह बहुजन मुक्ती पार्टी आणि आदिवासीं, पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीगोंदा पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलकांनी “आम्ही या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहोत. अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

स्रोत:(निवेदन)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading